रेल्वेचे डबे रुळावरून खाली घसरले, दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

गोंडा, 18 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील गोंडा-मानकापूर सेक्शनमध्ये चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे अनेक डबे आज अचानकपणे रुळावरून घसरले. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात ही दुर्घटना घडली. या अपघातात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून, 31 जण जखमी झाले आहेत. ही रेल्वे गोंडा रेल्वे स्थानकावरून दिब्रुगढमार्गे गोरखपूरला जात होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी याठिकाणी बचावकार्य सुरू केले. याठिकाणी बचावकार्य पूर्ण झाले असून, सध्या हा रेल्वे ट्रॅक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. तसेच या ठिकाणी रुळावरून बोगी हटवण्याचे काम देखील सुरू आहे, अशी माहिती लखनौ एसडीआरएफचे कमांडंट सतीश कुमार यांनी दिली आहे.

https://x.com/AHindinews/status/1813965023904924158?s=19

https://x.com/AHindinews/status/1813917255954211114?s=19

रेल्वे मंत्रालयाकडून आर्थिक मदत जाहीर

या रेल्वे अपघातात मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. यावेळी जखमींना प्रथमोपचार दिल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. ही रेल्वे गोंडापासून 20 किलोमीटर पुढे अंतरावर गेल्यानंतर ही दुर्घटना घडली. यावेळी रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली घसरले. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अपघातामुळे या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तसेच यामुळे काही गाड्या रद्द देखील करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2.5 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाईल, असे रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले. तसेच त्यांनी या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

https://x.com/myogiadityanath/status/1813886813905313836?s=19

मुख्यमंत्री योगी यांनी दिल्या सूचना

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रेल्वे अपघाताची तातडीने दखल घेतली आहे. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच या घटनेबद्दल योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. “गोंडा जिल्ह्यात झालेला रेल्वे अपघात अत्यंत दुःखद आहे. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे आणि जखमींना रुग्णालयात नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी भगवान श्री रामाला प्रार्थना करतो,” असे ट्विट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *