बारामती, 25 जूनः बारामती शहरातील कारभारी चौकातून बारामती ते नीरा रोड – बारामती ते फलटण रोड आणि बारामती ते मोरगाव रोड असे तीन रोड जातात. त्यामुळे या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ होत असते. भविष्याचा विचार केला तर बारामती ते नीरा रोड हा 45 मीटरचा रस्ता आहे. मात्र सद्यःस्थितीत हा रोड फक्त 12 मीटरचा आहे.
यासह बारामती फलटण रोड 45 मीटरचा असताना 14 मीटरचाच आहे. मोरगाव ते बारामती 36 मीटर रोड हा 12 मीटरचा रस्ता सद्यःस्थितीत आहे. हे सर्व टाऊन प्लॅन प्रमाणे नियोजनबद्ध निर्माण करणे व विकसित करणे हा मूळ उद्देश असतो. परंतु काही लोकांच्या हितासाठी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष कार्यालय, हिरोचे टू व्हीलर शोरूम, सातव संकुल, नंदन दूध संघ, टायटन शोरूम तसेच खरेदी विक्रीचा पेट्रोल पंप अशा अनेक इमारतींना चुकीच्या पद्धतीने बांधकाम परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे या कारभारी चौकात वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात वाढ आहे. या वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे मागील महिन्यात एक महिलेला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात संबंधित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.