पुणे, 27 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे 30 डिसेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार 30 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत विविध मार्गांवर वाहतूक बदलांच्या संदर्भात नियमावली करण्यात आली आहे. त्यानुसार, सोमवती अमावस्या यात्रेसाठी येणारी हलकी व इतर वाहने वगळून जड-अवजड वाहतूक बंद करून अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
https://x.com/Info_Pune/status/1872591338077835462?t=AexDXphOBnxLKU8vtJ0zIA&s=19
कोणत्या ठिकाणी वाहतुकीत बदल?
1. जेजुरी पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण):
सातारा, फलटण, लोणंद आणि बारामती येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची जेजुरी-सासवड मार्गे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या वाहनांना नीरा मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुण्याकडे वळविण्यात येईल. तसेच पुण्याकडून बारामतीकडे जाणाऱ्या वाहनांना बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव रोड बारामती किंवा फलटण या मार्गे वळविले जाईल.
2. सुपा पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण):
बारामती आणि नीरा बाजूकडून जेजुरीमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येईल. या वाहनांना मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गावरून पुण्याकडे वळविण्यात येईल.
3. सासवड पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण):
पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजुकडे जाणारी वाहनांची वाहतूक पुर्णपणे बंद करून ती सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड- वीर फाटा-परींचे-वीर-वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.
भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
या संदर्भातील नियमावली पुणे जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे. वाहतुकीस लावलेले हे निर्बंध 30 डिसेंबर रोजी होणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेसाठी येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी शिथील असणार आहेत. दरम्यान, जेजुरीतील श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेसाठी दरवर्षी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे जेजुरी परिसरात वाहतूक कोंडी होण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी वाहतुकीचे नियोजन केले असून, पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. वाहतुकीतील बदलांबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाकडून सूचना दिल्या जातील. त्यामुळे भाविकांनी त्यांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असेही प्रशासनाने सांगितले आहे.