दहीहंडी निमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल, वाहतूक पोलिसांची माहिती

पुणे, 27 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) देशासह राज्यभरात आज दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतो. पुणे शहरात देखील दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. या पार्श्वभूमीवर, पुणे शहरात आज वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत. या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत.

https://x.com/PuneCityTraffic/status/1827777573117403431?s=19

दहीहंडी फुटेपर्यंत वाहतुकीत बदल

दहीहंडी निमित्त पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजीरोड, लक्ष्मीरोड, बाजीराव रोड, टिळक रोड बुधवार चौक ते दत्तमंदीर चौक तसेच बेलबाग चौक ते सेवासदन चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक, मंडई चौक (बाबु गेणु चौक), साहित्य परिषद चौक, नवी पेठ यांसारख्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. ही परिस्थिती लक्षात घेऊन, अत्यावश्यक सेवेतील फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांसारखी वाहने वगळता पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यानूसार पर्यायी मार्गांची माहिती पुणे शहर वाहतूक पोलिसांनी दिली आहे. या पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, वाहतुकीतील हा बदल मंगळवार, दि. 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते दहीहंडी फुटे पर्यंत असणार आहे.

असे असणार पर्यायी मार्ग –

* शिवाजीरोड वरून स्वारगेटला जाण्यासाठी – स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक – पुढे टिळक रोडने/शास्त्री रोडने इच्छितस्थळी जातील.

* पुरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगर कडे जाण्यासाठी – पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने इच्छितस्थळी जातील. तसेच सणस पुतळा चौकातून सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छितस्थळी जातील.

* स.गो. बर्वे चौकातून पुणे महानगरपालिका भवनकडे जाण्यासाठी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील.

* बुधवार चौकातून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक सोडण्यात येईल. आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.

* रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतुक बंद करण्यात येत असून पर्यायी मार्गाचा वापर करावा.

* सोन्या मारूती चौकाकडून लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने सोन्या मारूती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून इच्छितस्थळी जातील.

* शिवाजी रोडवरून जिजामाता चौकातून गणेश रोडने दारूवाला पुलाकडे जाणारी वाहतूक ही गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक – पवळे चौक – जुनी साततोटी पोलीस चौकी मार्गे इच्छितस्थळी जाईल.

* गणेश रोडवरील संपूर्ण वाहतूक ही दारूवाला पुल येथून बंद राहील. तसेच देवजीबाबा चौक व फडके हौद चौकातील वाहतूक बंद करण्यात येईल. वाहनचालकांनी अपोलो टॉकिज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल, दुधभट्टी या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *