सिक्कीममध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना मिळणार राज्य सरकारकडून मदत, आज सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार

सिक्कीम, 17 जून: (विश्वजीत खाटमोडे) सिक्कीममध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. तसेच या ठिकाणी दरड कोसळण्याने अनेकजण अडकले आहेत. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे 1200 हून अधिक पर्यटक अडकल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्वांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील पायाभूत सुविधांचे देखील नुकसान झाले आहे. या ठिकाणच्या विविध भागात रस्ते वाहतूक, वीज, अन्न पुरवठा आणि मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाले आहेत. सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅली येथे देखील रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचाही समावेश आहे.

https://twitter.com/MahaDGIPR/status/1802397334430421335?s=19

https://twitter.com/MahaDGIPR/status/1802397331670659141?s=19

विशेष हेलिकॉप्टरने आणले जाणार

या घटनेची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळे याठिकाणी अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना राज्य सरकारच्या वतीने तातडीची मदत मिळणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सिक्कीममध्ये अडकलेल्या राज्यातील सर्व पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार बचाव कार्याला वेग आला असून, सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅली येथे अडकलेल्या राज्यातील सर्व पर्यटकांना आज हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरने गंगटोक मध्ये आणले जाणार आहे, या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

बचाव कार्यावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष

दरम्यान, राज्यातील हे सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच या पर्यटकांना आवश्यक ती मदत प्रशासनाकडून पोहोचवली जात आहे. लॅच्युन्ग व्हॅली येथे अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांना आज हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरने सुखरूप गंगटोक येथे सुरक्षितस्थळी आणले जाणार आहे. याशिवाय सिक्कीममध्ये राज्यातील अजून कुणीही अडकले असल्यास त्यांनी तात्काळ राज्य सरकारशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या बचावकार्यावर लक्ष आहे. ते वेळोवेळी याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *