दौंड, 17 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत राज्यातील अनेक मतदारसंघात चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघात देखील यंदा भाजप विरूद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्यात सामना रंगणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दौंड मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांचा सामना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रमेश थोरात यांच्याशी होणार आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या निवडणुकीत अटीतटीची लढत!
गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील रमेश थोरात आणि राहुल कुल हे नेते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये काटे की टक्कर पहायला मिळाली होती. या निवडणुकीत राहुल कुल यांनी रमेश थोरात यांचा केवळ 746 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्यात पुन्हा एकदा थेट सामना रंगणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील या दोन्ही नेत्यांमध्ये चुरशीची लढत होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे दौंड विधानसभा मतदारसंघात यावेळी जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राहुल कुल सलग दोनदा आमदार
दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राहुल कुल हे विद्यमान आमदार आहेत. दौंड मतदारसंघात राहुल कुल यांचे वडील सुभाष कुल तीन वेळा, तर त्यांच्या आई रंजना कुल या एकदा दौंडचे आमदार होते. दरम्यान, राहुल कुल यांनी सर्वप्रथम 2014 च्या विधानसभा निवडणुकीत रमेश थोरात यांचा पराभव केला होता. तेंव्हा राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांना 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. गेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल कुल यांनी रमेश थोरात यांचा निसटता पराभव केला होता. त्यामुळे दौंडमधून राहुल कुल हे सलग तिसऱ्यांदा आमदार होणार का? याची चर्चा सध्या दौंड तालुक्यात रंगली आहे.
रमेश थोरातांना शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी
तर दुसरीकडे रमेश थोरात हे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत दौंड मतदारसंघातून अपक्ष उमेदवार होते. तेंव्हाच्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर अपक्ष आमदार असलेल्या रमेश थोरात यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रमेश थोरात यांचा राहुल कुल यांनी पराभव केला होता. यादरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर रमेश थोरात यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत दौंडची जागा भाजपकडे आहे. त्यामुळे दौंडमध्ये महायुतीकडून भाजपचे राहुल कुल यांना उमेदवारी देण्यात आली. अशा परिस्थितीत यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी रमेश थोरात यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना शरद पवारांनी यांच्या पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी दौंडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत रमेश थोरात मागील दोन वेळा झालेल्या पराभवाची परतफेड करत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.