मुंबई, 05 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यानुसार, गुरुवार दि. 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफ करण्यात आला आहे. या संदर्भातील अध्यादेश जारी करण्यात आला आहे. गणेशभक्तांना मुंबई – बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही सवलत मिळणार आहे.
https://x.com/CMOMaharashtra/status/1831348758128250889?s=19
पासेस उपलब्ध करून देण्याच्या सूचना
या टोलमाफीच्या सवलतीसाठी ‘गणेशोत्सव 2024, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरूपाचे टोल माफी पासेस त्यावर गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस किंवा पोलीस, सबंधित प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौकी आणि आरटीओ कार्यालयात उपलब्ध करून देण्यात यावेत. तसेच हेच पास परतीच्या प्रवासाकरीता ग्राह्य धरण्यात येतील, असे राज्य सरकारने या आदेशात नमूद केले आहे.
एसटी बसेसना देखील टोल माफी
सोबतच या कालावधीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसना देखील टोल माफीची सवलत मिळणार आहे. गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस येणार आहेत. त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि हे पास मिळण्याबाबतची माहिती नागरिकांना द्यावी, अशा सूचना राज्य सरकारने या आदेशात दिल्या आहेत.