एसटीच्या संपाचा आज दुसरा दिवस! खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट

पुणे, 04 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे सध्या अनेक भागांतील एसटी बसेस बंद आहेत. या संपाचा आज दुसरा दिवस आहे. या संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. राज्यात सध्या गणेशोत्सव तोंडावर आला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. अशा परिस्थितीत एसटीच्या संपामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

प्रवाशांकडून जास्त भाड्याची आकारणी

तर दुसरीकडे, एसटीच्या संपामुळे खासगी ट्रॅव्हल्सकडून सध्या प्रवाशांची सर्रास लूट झालेली पहायला मिळत आहे. या संपामुळे एसटी बसेस बंद असल्याने सध्या राज्यातील सार्वजनिक वाहतूक कोलमडून पडली आहे. त्यामुळे गावी जाण्यासाठी नागरिकांसमोर खासगी ट्रॅव्हल्स वाहनांचा पर्याय आहे. परंतु, अनेक खासगी वाहन चालक सध्या प्रवाशांकडून जास्त भाडे मागताना दिसत आहेत. तसेच राज्यातील बहुतांश भागांत अनेक खाजगी वाहन चालक प्रवाशांकडून 100 ते 150 रुपये जास्त भाडे घेत असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत एसटीच्या संपाचा खाजगी ट्रॅव्हल्सला अप्रतिक्षरित्या फायदा होत असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये रंगली आहे. त्यामुळे राज्य सरकारने एसटीच्या संपावर तातडीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

https://x.com/samant_uday/status/1831029365272129601?s=19

संपावर आज तोडगा निघणार?

दरम्यान, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल या संपाबाबत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची चर्चा केली. परंतु, त्यांची ही बैठक निष्फळ ठरली. या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. “एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात सायंकाळी 7 वाजता कर्मचारी संघटनांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत सर्व प्रश्नांवर तोडगा निघेल असा मला विश्वास वाटतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मान राखत कर्मचारी संघटनांनी गणेशोत्सवाच्या तोंडावर पुकारलेले आंदोलन स्थगित करावे आणि गणेशभक्तांची वाट सुकर करावी,” असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *