मुंबई, 05 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईत आज (दि.05) राज्य सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची तयारी सध्या पूर्ण झाली आहे. या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्री, राजकीय पक्षांचे बडे नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने आझाद मैदानावर तयारी केली गेली आहे. तसेच याठिकाणी सुरक्षेची देखील मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेबाबत मुंबईचे सह पोलीस आयुक्त सत्य नारायण चौधरी यांनी अधिक माहिती दिली आहे.
https://x.com/ANI/status/1864287515886473540?t=8b_6C_VbkMmHkqBWLph66A&s=19
4000 हजारांहून अधिक पोलीस तैनात
या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर मुंबई पोलिसांनी 5 अतिरिक्त आयुक्त, 15 पोलिस उपायुक्त, सुमारे 700 अधिकारी, सुमारे 3 हजार पोलीस कर्मचारी यांच्यासह 5 एसआरपीएफ कंपन्या तैनात केल्या आहेत. यासोबतच बॉम्ब शोध व निकामी पथक आणि क्विक रिॲक्शन टीम यांचा देखील यात समावेश आहे, असे सह पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
8000 हून अधिक CCTV कॅमेऱ्यांची नजर
शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर व्यापक पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वाहतूक वळवण्यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या ठिकाणी देखील चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबईतील सर्व प्रवेश स्थळांवर आणि गर्दीच्या ठिकाणी अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. सोबतच शहरात 8 हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. एकंदरीतच या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांकडून मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्त तैनात
राज्य सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात कडक व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी महिलांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी निर्भया पेट्रोलिंग मोबाईल पथक आझाद मैदानावर तैनात असणार आहे. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला अधिकारी आणि महिला हवालदारही तैनात केले आहेत. सोबतच शहरात 400 हून अधिक पेट्रोलिंग मोबाईल आणि 350 हून अधिक बीट मार्शल पथक तत्काळ मदतीसाठी उपस्थित राहणार आहेत, असे सह पोलीस आयुक्त सत्य नारायण चौधरी यांनी सांगितले आहे. नागरिकांनी सुरक्षेसंदर्भातील नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.