मेरठ, 15 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक तीन मजली इमारत कोसळण्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये 2 पुरूष आणि 8 महिला आहेत. ही घटना शनिवारी (दि.14) संध्याकाळी घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलासह एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी बचावकार्य सुरू केले. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून ही इमारत सील करण्यात आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा सध्या शोध घेतला जात आहे.
https://x.com/AHindinews/status/1835174737313775698?s=19
पाच जण जखमी
उत्तर प्रदेशातील मेरठ मधील झाकीर कॉलनीतील ही इमारत आहे. सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही इमारत अचानकपणे कोसळली. या इमारतीत एकूण 15 लोक होते. या दुर्घटनेत त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी पोलीस, अग्निशमन दल आणि एसडीआरएफच्या पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची सुटका केली. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ढिगारा हटविण्याचे काम सुरू
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दल आणि एसडीआरएफच्या पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन इमारतीचा ढिगारा हटवण्यास सुरूवात केली. परंतु, मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा हटविण्यासाठी आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यावेळी स्थानिक लोक देखील घटनास्थळी जमा झाले. स्थानिक लोकांनी बचाव पथकाला दगड आणि विटांचा ढिगारा हटविण्यासाठी मदत केली. सध्या बचाव पथकाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. आत कोणी नसल्याचे स्पष्ट होईपर्यंत बचावकार्य सुरूच राहणार असल्याचे मेरठचे जिल्हाधिकारी दीपक मीना यांनी सांगितले आहे.