पुणे, 23 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) पैशाच्या वादातून अपहरण झालेल्या एका व्यवसायिकाची मुंबई पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 30 वर्षीय कापड व्यावसायिक हेमंत कुमार रावल यांचे 22 जुलै रोजी काही जणांनी मिळून अपहरण केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी हेमंतकुमार रावल यांची अवघ्या 12 तासांत पुण्यातून सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी कपूरम घांची, प्रकाश पवार आणि गणेश पात्रा या तिघांना अटक केली आहे. त्यांना कोर्टाने 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
https://x.com/ANI/status/1815478341572710640?s=19
पैशाच्या वादातून अपहरण केल्याचे उघड
तत्पूर्वी, हेमंतकुमार रावल आणि कपूरम घांची या दोघांनी मिळून कापडाचा व्यवसाय सुरू केला होता. कपूरम घांची हा हेमंतकुमार रावल यांना अहमदाबादहून कपड्याचा माल पुरवत होता. रावल हे त्या कपड्याची विक्री पुण्यात करीत होते. परंतु, हेमंतकुमार रावल हे अनेक महिन्यांपासून कपूरम घांचीला कपड्याच्या मालाचे 30 लाख रुपये देऊ शकले नाहीत. तेंव्हा कपूरम घांचीने हेमंतकुमार रावल यांच्या अपहरणाचा कट रचला. त्यानंतर त्याने 22 जुलै रोजी आपल्या मित्रांसोबत मिळून हेमंतकुमार रावल यांचे अपहरण केले. त्यावेळी त्यांनी रावल यांना मारहाण देखील केली. याप्रकरणी, तक्रार आल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. त्यावेळी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तसेच आरोपीच्या फोनचे लोकेशन ट्रेस केले आणि घटनास्थळी छापा टाकून या प्रकरणात कपूरम घांची याच्यासह तीन जणांना अटक केली. या आरोपींनी त्यांना पुण्याच्या कोंढवा परिसरातील एका दुकानात डांबून ठेवले होते. अशी माहिती लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी दिली आहे.
आणखी तिघे फरार
तसेच या प्रकरणात आणखी तीन जणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सध्या हे तिघे फरार झाले असून त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान, कपूरम घांची, प्रकाश पवार आणि गणेश पात्रा यांना अटक केल्यानंतर कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने या तिघांना 25 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.