कल्याण, 25 डिसेंबर: ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. विशाल गवळी असे या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात आरोपी विशाल गवळीची तिसरी पत्नी देखील सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, आरोपी विशाल गवळीने तीन लग्न केली आहेत. त्याच्या पत्नीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. तसेच त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात चीड असून आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
काल मृतदेह सापडला होता
आरोपी विशाल गवळी याने सोमवारी (दि.23) दुपारी या मुलीचे कल्याण परिसरातून अपहरण केले होते. त्यानंतर या मुलीच्या पालकांनी तिचा शोध घेणे सुरू केले. मात्र त्यांना ही मुलगी कोठेच सापडली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांनी याप्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला. परंतु या मुलीचा मृतदेह मंगळवारी (दि.25) ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील बापगाव भागातील एका निर्जन स्थळी आढळून आला. त्यावेळी मुलीच्या पालकांनी हा मृतदेह आपल्या मुलीचा असल्याचे ओळखले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.
विशाल गवळीला शेगाव मधून अटक
तपास सुरू झाल्यावर पोलिसांनी मुख्य आरोपीची ओळख पटवली. या गुन्ह्यामध्ये विशाल गवळी सह त्याची पत्नी आणि एक रिक्षाचालक हे तिघे सहभागी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली. यामध्ये पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली. रिक्षाचालकाच्या चौकशीत आरोपी विशाल गवळीचे नाव पुढे आले. दरम्यान, विशालने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रिक्षाचालकाची रिक्षा बोलावली होती. त्यानंतर पोलिसांनी विशाल गवळीचा शोध घेणे सुरू केले. त्यावेळी पोलिसांनी आरोपी विशालच्या पत्नीला अटक केली. त्याच्या पत्नीने यावेळी पोलिसांना विशालने केलेल्या या गुन्ह्याची माहिती दिली. विशालने हा गुन्हा केला असून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला मदत केली असल्याचे त्याच्या पत्नीने कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विशाल गवळी याला बुधवारी (दि.25) सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून अटक केली.
आरोपी विरोधात यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल
दरम्यान, आरोपी विशाल गवळी हा एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी सहा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये विनयभंग, लैंगिक अत्याचार, पॉक्सो, मारामारी, चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे यापूर्वी त्याला तडीपार देखील करण्यात आले होते. त्यावरून हा आरोपी विकृत मानसिकतेचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर या घटनेनंतर आरोपीविरोधात नागरिक संतप्त झाले आहेत. यामध्ये आरोपी विशाल गवळी याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.