व्हेल माशाच्या उलटीची तस्करी केल्याप्रकरणी तिघांना अटक

ठाणे, 29 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) व्हेल माशाच्या उलटीची तस्करी केल्याच्या आरोपावरून तिघांना अटक करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटने ही कारवाई केली आहे. अनिल भोसले, अंकुश शंकर माळी, लक्ष्मण शंकर पाटील असे या अटक केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, व्हेल माशाच्या उलटीला एम्बरग्रीस असे म्हटले जाते. या उलटीला बाजारात कोट्यवधी रुपयांची मागणी आहे. भारतात व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

https://x.com/ANI/status/1840205875660869968?t=4ni4XNLPNdbL1AEQYoWcbg&s=19

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

तत्पूर्वी, हे तिघे आरोपी ठाणे जिल्ह्यातील बदलापूरकडे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यासाठी जात असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम राबवून त्या आरोपींना अटक केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून व्हेल माशाची उलटी जप्त केली. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यावधी रुपयांची किंमत आहे. कोर्टाने या तिघा आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या ठाणे पोलीस करीत आहेत.

व्हेल माशाची उलटी असते मौल्यवान

दरम्यान, व्हेल माशाला जेंव्हा अन्न पचवता येत नाही, तेंव्हा तो उलटी करतो. या उलटीला एम्बरग्रीस असे म्हणतात. हे मेणाच्या दगडासारखे दिसते आणि त्याचा रंग गडद असतो. या व्हेल उलटीचा वापर परफ्युम बनविण्यासाठी होतो. बहुतांश परफ्युम तयार करणाऱ्या कंपन्या व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग करतात. याशिवाय, सुगंधित धूप आणि अगरबत्ती बनविण्यासाठी तसेच विविध रोगांवरील औषधे आणि सेक्सशी संबंधित आजारांवरील उपचारांत देखील व्हेलच्या उलटी वापर केला जातो. त्यामुळे त्याला करोडो रुपयांची मागणी असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *