बारामती, 9 डिसेंबरः बारामती एमआयडीसी येथील महिला सोसायटी समोरील ऑक्सिजन प्लांटजवळ 4 डिसेंबर 2022 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या देवेंद्र वेताळ (वय- 21, रा. सध्या बॉईज हॉस्टेल मेडिकल कॉलेज बारामती) या विद्यार्थ्याला नग्न करून लुटणाऱ्याला अवघ्या काही तासातच पकडण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात तीन संशयित आरोपींना अवघ्या 4 तासात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी राहुल उघाडे (वय 23, रा. पाहुणेवाडी, बारामती), सुमित पवार (वय 24, बांदलवाडी, इंदापूर), भूषण रणसिंग (वय 20, मार्केट यार्ड रोड, बारामती) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकिय शिक्षण घेणारा देवेंद्र वेताळ हा विद्यार्थी, रविवारी (4 डिसेंबर) रोजी सुट्टीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करण्यासाठी पेन्सिल चौकातील सुभद्रा मॉल येथे पायी गेला होता. तो खरेदी करून परत एकटा बॉईज हॉस्टेलच्या दिशेने चालत येत असताना बारामती एमआयडीसीमधील ऑक्सिजन प्लांट जवळ एक अज्ञात व्यक्ती मोटरसायकलवरून आला. त्याने देवेंद्रला शिवीगाळ करण्यास सुरु केली. तसेच दमदाटी करत देवेंद्रच्या खिशातून 15 हजार रुपये मारहाण करीत जबरदस्तीने काढून घेतले. त्याच ठिकाणी दुसऱ्या मोटरसायकलवरून दोन व्यक्ती आले. पैसे काढून घेतलेला व्यक्ती आणि ते दोन व्यक्ती एकमेकांशी बोलू लागले. त्यावेळी पैसे घेतलेला व्यक्ती बाकी दोघांना सांगू लागला की, मी याचे काढून घेतलेले पैसे हा मला परत मागत आहे. त्यामुळे चिडून जाऊन त्या तीन व्यक्तींनी देवेंद्रला हाताने मारहाण शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच देवेंद्रला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून गोरड हॉस्पिटलच्या पाठीमागील शेतात घेऊन गेले.
नागरीकांनी अनुभवली सुर्याची दोन प्रतिबिंब!
या शेतात देवेंद्रला कपडे काढून उसाने डोक्यात आणि मांडीवर मारहाण केली. या मारहाणीत देवेंद्रचा अंगठा फॅक्चर झाला. तसेच देवेंद्रचे नग्न फोटो काढत आणखी पैशांची मागणी केली. अन्यथा नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर देवेंद्रने आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून 10 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर पुन्हा 4 हजार 500 रुपये काढले. त्यानंतर देवेंद्रला सोडून तेथून पळ काढला. त्यानंतर देवेंद्रने रिक्षा स्टॅन्ड येथून महिला हॉस्पिटल येथे जात प्राथमिक उपचार घेतला.
सदर घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी योग्य त्या सूचना देत तात्काळ तपास पथक सदर ठिकाणी पाठवले. महिला हॉस्पिटल या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व तपास पथकातील अंमलदार राम कानगुडे, पो. कॉ.संतोष मखरे हे पोहोचल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ त्या अनोळखी तीन लुटारूंचा शोध घेण्यास सुरुवात केली. अथक परिश्रम घेतल्यानंतर व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पथकाने सदर तीन संशयित आरोपींना अवघ्या 4 तासाच्या आत मध्ये शोधून गजाआड केले. या तीन संशयित आरोपींना बारामती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष हजर केले असता त्यांना 9 डिसेंबर 2022 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिले आहे.
आजपासून शरद कृषी महोत्सवाला सुरुवात
सदरची कामगिरी पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भुईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सपोनि योगेश लंगुटे, पो. हवा. राम कानगुडे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे, दीपक दराडे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास स .पो .नि. राहुल घुगे हे करीत आहेत.
2 Comments on “वैद्यकीय विद्यार्थ्याला नग्न करून लुटणाऱ्यांना अवघ्या 4 तासात अटक!”