मुंबई, 19 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर काल (दि.18) काही जणांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे. त्यावरून सध्या आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे.
https://x.com/supriya_sule/status/1858542612023832866?t=JSvHrd-R0Ej04wFc45EcZw&s=19
सुप्रिया सुळे यांचे ट्विट
“प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो,” असे सुप्रिया सुळे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून, गुंडांना मोकळे रान मिळाले आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन, अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, अनिल देशमुख काल रात्री एक प्रचारसभा उरकून घरी जात असताना नागपूर जिल्ह्यातील काटोल – जलालखेडा रोडवर त्यांच्या कारवर काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्यावेळी अनिल देशमुख यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तर अनिल देशमुख यांची प्रकृती सध्या ठीक आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर हा हल्ला करणाऱ्यांचा आता पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.