पंढरपूर, 15 एप्रिलः महाराष्ट्रात कोरोना संकट आटोक्यात आल्याचं चित्र आहे. यामुळे राज्यात पुन्हा सण-उत्सवांना मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. यंदा 2 वर्षांनंतर पुन्हा पंढरपूरच्या वारीचा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचा पायी सोहळा पार पडणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी यात्रेत 21 जून दिवशी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
पंढरपूरच्या संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत 21 जूनला माऊलींची पालखी प्रस्थान ठेवणार असल्याचे जाहीर केले. लोणंदमध्ये अडीच दिवस, तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी सोहळा मुक्काम करणार आहे. यंदा 2 वर्षांनी पुन्हा वारकरी मंडळी पायी आषाढी वारीत सहभागी होऊ शकणार आहेत. त्यामुळे राज्यातील वारकऱ्यांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे.
माऊलींची पालखी 21 जूनला संध्याकाळी 4 वाजता आळंदीतून प्रस्थान ठेवेल. नंतर 22 व 23 जून पुण्यात, 24 व 25 जून सासावड, 26 जून जेजुरी, 27 जून वाल्हे, 28 व 29 जून लोणंद, 30 जून तरडगांव, 1 व 2 जुलै फलटण, 3 जुलै बरड, 4 जुलै नातेपुते, 5 जुलै माळशिरस, 6 जुलै वेळापूर, 7 जुलै भंडीशेगाव, 8 जुलै वाखरी आणि 9 जुलै दिवशी पंढरपूरला दाखल होणार आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे संत ज्ञानेश्वरांच्या पादुका बसने पंढरपूरला रवाना केल्या जात होत्या. मोजक्या वारकर्यांना या पादुकांसोबत प्रवासाची संधी देण्यात आली होती. यंदा मात्र पुन्हा पूर्वीप्रमाणे आनंदसोहळा साजरा करता येणार असल्याने वारकरी समुदायात आनंदाचे वातावरण आहे.