मुंबई, 23 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार महायुती 227 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप 131 जागा, शिवसेना 55 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 41 जागांवर आघाडीवर आहे. तसेच या निवडणुकीत महाविकास आघाडी 47 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 21 जागा, काँग्रेस 16 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, यामधील काही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. तर बहुतांश जागांवरील मतमोजणी सध्या सुरू असून, लवकरच त्या सर्व जागांचे निकाल समोर येणार आहेत.
https://x.com/mieknathshinde/status/1860237517900976521?t=Lq5aZPF6q76dnm_b4J87PQ&s=19
एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले?
विधानसभा निवडणुकीचे निकाल महायुतीच्या बाजूने येताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. “सर्व मतदारांचे मन:पूर्वक आभार. समर्पित भावनेनं महाराष्ट्राच्या समृध्दीसाठी आणि सामन्यांच्या कल्याणासाठी राबणाऱ्या महायुती सरकारला निर्विवाद आणि घवघवीत यश मिळाले आहे. महाराष्ट्रात महायुतीच लाडकी ठरली. हा विजय माझ्या लाडक्या बहिणींचा आहे, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा आहे.” असे एकनाथ शिंदे यामध्ये म्हणाले आहेत.
राज्यातल्या कॉमन मॅनने सुपरमॅनसारखे मतदान केले. त्यामुळे हा विजय राज्यातल्या सर्वसामान्यांचा आहे, सर्वसामान्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सरकारचा आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या आशीर्वादाचा, विचारधारेचा हा विजय आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या पाठबळामुळे जनतेच्या मनातले सर्वसामान्यांचे सरकार राज्यात सत्तेत येऊ शकले. असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सहकाऱ्याने या राज्यात ऐतिहासिक काम करता आले. यापुढे अधिक उत्साहाने आणि वाढलेल्या जबाबदारीच्या भावनेसह जोमाने काम करण्याची उमेद या निर्विवाद विजयाने दिली आहे. हा आशीर्वाद शिरोधार्य मानून महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर दुप्पट वेगाने नेण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. शरीरातला प्रत्येक कण आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण लाडक्या महाराष्ट्रासाठी वाहून घेणार, हे वचन! पुन्हा एकदा सर्व मतदारांना त्रिवार दंडवत” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.