बीड, 19 मे: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत चार टप्प्यात मतदान पार पडले आहे. या मतदानात गैरप्रकार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. या संदर्भातील अनेक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेयर केले होते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज बीड लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर गैरप्रकार झालेले आणखी व्हिडिओ ट्विट केले आहेत.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1792050261176832239?s=19
निवडणूक आयोगावर निशाणा
तसेच रोहित पवार यांनी या गैर प्रकाराबद्दल मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह स्थानिक प्रशासनाची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर या प्रकरणावरून रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग किती दिवस बघ्याची भूमिका घेतं, हे बघुया. निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार आहे की केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे? याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
मंत्री आणि प्रशासनाची चौकशी करावी
“बूथ ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा हा नवा परळी पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही. पंकजा ताई तुम्ही कदाचित यामध्ये सहभागी नसालही, पण तुमचे बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे कदाचित तुम्हालाही माहित नसेल. महाराष्ट्रासारख्या राज्यात असे प्रकार घडवून आणण्याची हिम्मत येतेच कुठून? असे प्रकार करण्याची गरज पडतेच का? सत्तेतून ही हिम्मत येत असेल तर मग ही लोकशाहीसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. निवडणूक आयोगाने स्थानिक मंत्री महोदयासह स्थानिक प्रशासनाची चौकशी करावी ही विनंती. निवडणूक आयोग किती दिवस बघ्याची भूमिका घेतं, हे बघुया!” असे ट्विट रोहित पवारांनी केले आहे.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1791794874368643317?s=19
रोहित पवारांचे आणखी एक ट्विट
बीड जिल्ह्यात विशेषता परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे तसे मतदान भाजपने गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का? हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार आहे की केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे? याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, असे ट्विट रोहित पवारांनी केले आहे.