मुंबई, 15 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणुकीच्या प्रचाराला सध्या चांगलाच वेग आला आहे. यादरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला आम्ही विरोध केला आहे. फक्त आम्हीच नाही तर भाजपच्या काही नेत्यांनी देखील या घोषणेला विरोध केला असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. ते एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
https://x.com/AHindinews/status/1857315179614392600?t=3w8x-cZP8ae6uB4F9h2gXg&s=19
अजित पवार नेमके काय म्हणाले?
“बटेंगे तो कटेंगे या घोषणेला मी एकटाच विरोध नाही केला, तर माझ्या पक्षाने ही केलाच. शिवाय पंकजा मुंडे यांसारख्या भाजपच्या नेत्यांनी देखील बटेंगे तो कटेंगे या घोषणेला विरोध केला आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री इथे येतात आणि ते बटेंगे तो कटेंगे बोलतात. याबाबत आम्ही लगेच सांगितले, हा उत्तर प्रदेश नाही. आम्ही समर्थन करत नाही. उत्तरेकडे हे सर्व चालत असेल. आमचा महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर चालत आहे,” असे अजित पवार यावेळी म्हणाले.
महायुतीत मतभेद?
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारादरम्यान बंटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली होती. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपच्या आणि योगी आदित्यनाथ यांच्या या घोषणेवर टीका केली आहे. तसेच अजित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि अशोक चव्हाण यांसारख्या प्रमुख नेत्यांनी बंटेंगे तो कटेंगे या घोषणेला विरोध दर्शवला होता. यापूर्वी, बंटेंगे तो कटेंगे ही घोषणा महाराष्ट्राला आवडणार नाही, असे म्हटले होते. तर पंकजा मुंडे यांनी देखील या घोषणेवर स्पष्टपणे बोलताना बंटेंगे तो कटेंगे अशा घोषणांची महाराष्ट्राला गरज नाही, असे विधान केले होते. त्यामुळे आता या घोषणेवरून महायुतीमध्ये मतभेद असल्याचे पहायला मिळत आहे.