मतदान करताना मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास हे 12 प्रकारचे पुरावे ओळख म्हणून ग्राह्य

मुंबई, 14 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेबर 2024 रोजी मतदान होणार आहे. हे मतदान करण्यासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. या 12 प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. ह्या सर्व पुराव्यांची यादी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे.

https://x.com/CEO_Maharashtra/status/1849082527970927013?t=EHzBBo9v6jJroQosX9UDFQ&s=19

खालीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदानावेळी स्वतः सोबत बाळगा –

1) आधार कार्ड
2) मनरेगा रोजगार ओळखपत्र
3) बँक किंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले पासबुक
4) कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
5) वाहन चालक परवाना
6) पॅन कार्ड
7) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही स्मार्ट कार्ड
8) पासपोर्ट
9) निवृत्तीवेतनाची दस्तावेज,
10) सरकारी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र
11) संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र
12) दिव्यांग व्यक्तींचे ओळखपत्र

5 दिवस आधी माहितीच्या चिठ्ठयांचे वाटप

दरम्यान, एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, परंतु त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव सध्याच्या पत्यासह मतदार यादीत असणे बंधनकारक आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले आहे. तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान तारखेच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठयांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *