तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत, अर्थमंत्र्यांचे पती परकला प्रभाकर यांच्या वक्तव्याने खळबळ

नवी दिल्ली, 10 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठे विधान केले आहे. 2024 मध्ये पुन्हा भाजप सरकार स्थापन झाले तर, देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत, असे खळबळजनक वक्तव्य परकला प्रभाकर यांनी केले आहे. त्यांनी हे सर्व एका मुलाखतीदरम्यान सांगितले. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ काँग्रेस पक्षाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केला आहे.

परकला प्रभाकर यांनी काय म्हटले?

हे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास पुन्हा निवडणुकीची अपेक्षा करू शकत नाही, अशी शक्यता आहे. त्यानंतर निवडणुका होणार नाहीत. तसेच देशाचे संविधान आणि नकाशा पूर्णपणे बदलेल, तुम्ही याला ओळखू देखील शकणार नाहीत, असे ते म्हणाले आहेत. एखाद्याला पाकिस्तानला पाठवा, त्याला इकडे पाठवा तिकडे पाठवा. ह्याला त्याला मारायचे, असे आपल्याला नेहमी ऐकायला मिळते, पण अशा गोष्टी तुम्हाला लाल किल्ल्यावरून ऐकायला मिळतील, असे परकला प्रभाकर म्हणाले आहेत. तसेच देशात सर्वत्र मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

परकला प्रभाकर कोण आहेत?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर हे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आहेत. परकला प्रभाकर यांचा 1986 मध्ये निर्मला सीतारामन यांच्याशी विवाह झाला. परकला प्रभाकर यांचे आई वडील काँग्रेस आमदार आणि मंत्री होते. 2014 ते 2018 पर्यंत ते आंध्र प्रदेश सरकारचे कॅबिनेट दर्जाचे अधिकारी होते. तसेच परकला प्रभाकर हे आंध्र प्रदेश सरकारचे दळणवळण सल्लागारही राहिले आहेत. त्यांनी यापूर्वी अनेकदा मोठमोठ्या पदांवर काम केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *