मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही – मुख्यमंत्री

नागपूर, 07 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न आहे. तसेच विदर्भामध्ये हे हिवाळी अधिवेशन होत आहे. विदर्भाशी आमचे जिव्हाळ्याचे एक नातं आहे. विदर्भातील जनतेला ही अधिवेशनामधून न्याय देताना एक विशेष आनंदही होत आहे. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि कालबद्धरितीने जे प्रकल्प, योजनांचे निर्णय घेतले आहेत, ते पूर्ण केले जातील. गेल्या दीड वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत विकास कामे पोहोचण्याचे काम हे सरकार करत आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

शासन आपल्या दारी या उपक्रमात काल बीडमध्ये 70 ते 80 हजार लोक उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात सुमारे 2 कोटी नागरिकांनी लाभ घेतला आहे. जिल्हाधिकारी, तलाठी, तहसीलदार हे लाभार्थ्य्यांपर्यंत जाऊन त्यांना लाभ देत आहेत. लाभार्थी स्टेजवर येऊन लाभ घेतात हे चित्र देशात फक्त आपल्या राज्यात दिसत आहे. आमच्या सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्तीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली आहे. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नुकसान होत असलेल्या ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रधानमंत्री किसान योजनेत लाभ दिला आहे. त्याबरोबरच देशात महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना घोषित करून आणखी सहा हजार प्रति शेतकरी लाभ देण्यात सुरूवात केली आहे. अवकाळी गारपीटीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात शासन हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1732437246077493544?s=19

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण संदर्भात देखील भाष्य केले आहे. मराठा आरक्षण विषयावर सरकारची भूमिका ही सुरुवातीपासून अतिशय प्रामाणिक आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर कुठलाही अन्याय होणार नाही तसेच इतर समाजावर अन्याय होणार नाही. तसेच कोणाचेही आरक्षण कमी केले जाणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. त्यावर मंत्रिमंडळ हे ठाम आहे. मराठा समाजाला टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही समाजाने संयम ठेवावा असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *