सदावर्तेंनी पुकारलेल्या संपाला एसटी कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद नाही

मुंबई, 6 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा एसटी संपाची हाक दिली आहे. त्यानुसार गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघातील कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत. या संपामध्ये मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी सहभागी होतील, असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. त्यामुळे ऐन दिवाळीत एसटी प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्यांच्या या संपाला एसटी कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळताना दिसत नाही. तर आज सकाळपासूनच राज्यातील सर्वच विभागात एसटी सेवा सुरळीत चालू आहेत. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांनी पुकारलेल्या संपाकडे एसटी कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 243 धावांनी विजय

“राज्यातील एसटी महामंडळाच्या 85 टक्के बसेस या नादुरुस्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच ह्या बसेसमुळे एसटी चालक आणि वाहक यांचा जीव देखील धोक्यात आहे. यासंदर्भात सरकारने उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे”, असे गुणरत्न सदावर्ते यांनी काल म्हटले होते. तर सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणे यांसारख्या विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारच्या वतीने एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

बीड हिंसाचाराची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी – धनंजय मुंडे

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी यापूर्वी देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्व केले होते. तेंव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात होते. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने 6 महिने संप पुकारण्यात आला होता. या संपाला एसटी कर्मचाऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत काम बंद आंदोलन केले होते. त्यामुळे एसटी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

One Comment on “सदावर्तेंनी पुकारलेल्या संपाला एसटी कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद नाही”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *