लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध असण्याचे कारण नाही, अजित पवारांचे स्पष्टीकरण

मुंबई, 27 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. याचा लाभ राज्यातील करोडो महिलांना होणार आहे. दरम्यान, या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करून अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1817119435397763583?s=19

योजनेला 35 हजार कोटींची तरतूद केली

“महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली. चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार? हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे,” असे अजित पवार यांनी यामध्ये म्हटले आहे.

माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे थांबवावे!

“राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही. काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया,” असे अजित पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *