बारामती, 29 जूनः बारामती तालुक्यातील मौजे मेखळी येथे नुकताच एक धक्कादायक माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला. मौजे मेखळी येथील अनुसूचित जमातीच्या मयतला दहन करण्यासाठीची जागा उच्चभ्रू समाजाने ठेवली नाही व दिली नाही. त्यामुळे अनुसूचित जमातीला बारामती प्रात कार्यालय येथे आंदोलन करावे लागणे ही लाजिरवाणी गोष्ट बारामतीमध्ये घडत आहे.
बारामतीमध्ये तीन खासदार, दोन आमदार व तालुक्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच सदस्य पंचायत समिती सदस्य व सर्व ग्रामपंचायत सत्ता, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. तरीसुद्धा बारामती तालुक्यामध्ये अनुसूचित जमातीच्या मयताला जागा मिळत नाही.
भारतीय संविधानाने मूलभूत हक्कांमध्ये प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे आणि प्रत्येक मृत व्यक्तीची मयतासाठी व दहन करण्यासाठी शासनाने किंवा स्थानिक प्रशासनाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी घटनेमध्ये तरतूद आहे. तरीसुद्धा या महाराष्ट्रामध्ये अशी गोष्ट होत आहे. यावर बारामतीमध्ये गावातल्या शहरांमध्ये स्थानिक खासदार व केंद्रीय राष्ट्रीय अध्यक्ष व पालकमंत्री यांचे दुर्लक्ष होत आहे का? अशी चर्चा अनुसूचित जमाती व जातीमध्ये होत आहे.
मयतासाठी जागा मिळत नाही, यासाठी स्थानिक लोकप्रिय आदरणीय खासदार व आमदार यांना पत्र व्यवहार केलेत. परंतु अनुसूचित जमातीच्या लोकांना कुठलाही न्याय अद्याप पर्यंत भेटलेला नाही. त्यांना फक्त आंदोलन करावे लागते, अजून सुद्धा अस्पृश्यता नष्ट झाली नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला लोकशाही दिली, या देशाचं संविधान दिलं, परंतु तरीसुद्धा प्रत्येक जातीवाद्यांची मानसिकता अजूनही नष्ट झाली नाही. फक्त आणि फक्त जातिवाद करायचा! ही गोष्ट जातीवाद्यांच्या मनामध्ये रुजली आहे. महाराष्ट्रात शासन करणारे मंत्री, पालकमंत्री व प्रशासन संविधानाचा मार्ग अवलंब का करत नाही? आणि ज्यांनी जागा दिली नाही, त्यांच्यावर कारवाई का करत नाही? त्यांच्यावर फौजदारी गुन्हे का दाखल होत नाही? त्यामुळे या मानसिकेच्या विरोधात अनुसूचित जाती- जमाती मधील समाज आंदोलनाच्या तयारीत आहे. शासन आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे? असा प्रश्न अनुसूचित जाती आणि जमाती यामध्ये पडत आहे. या प्रकारानंतर अनुसूचित जाती- जमातींच्या समाजावर पुन्हा जुने दिवस परत येणार नाही ना? अशी चिंता ‘भारतीय नायक’ च्या प्रतिनिधीशी बोलताना मयताच्या नातेवाईकाने बोलून दाखवली.