पुणे, 11 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची चौकशी करण्यात यावी. तसेच या प्रकरणात अमितेश कुमार यांच्या विरोधात राज्य सरकार काय कारवाई करणार? असा प्रश्न गुरूवारी (दि. 11 जुलै) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषद सभागृहात उपस्थित केला होता. त्यांच्या या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अतिशय सक्रियतेने कार्यवाही केली आहे. त्यामुळे कोणाच्या दबावाखाली येऊन त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1811312420469493948?s=19
फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील पोलिसांनी केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती देवेंद्र फडणवीस यावेळी यांनी दिली. ही घटना पहाटे 2.30 वाजता घडली होती. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सकाळी 8.13 वाजता आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. या एफआयआर मध्ये सर्वप्रथम 304 (अ) या कलमाची नोंद करण्यात आली होती. परंतु, पोलीस ठाण्यात सकाळी 10.30 वाजता वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर त्यांनी या कलमात बदल करून 304 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
आरोपीला सज्ञान मानावे, पोलिसांनी मागणी केली होती: फडणवीस
त्याच दिवशी दुपारी बारा वाजल्यानंतर बाल न्यायालयासमोर ही केस पाठवण्यात आली. यामध्ये आरोपीला सज्ञान मानून खटला चालवावा, अशीही मागणी त्याच अर्जात करण्यात आली होती. परंतु दुर्दैवाने बाल न्यायालयाने पोलिसांची ही मागणी मान्य केली नाही. तेंव्हा पोलिसांनी या निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात अपील केले होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या सर्व प्रकरणांमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अतिशय सक्रियतेने कार्यवाही केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता नाही. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पोलीस निरीक्षकांवर कारवाई
तसेच या प्रकरणात पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. कारण, त्यांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी केली नव्हती, अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. पोलिसांनी अतिशय तत्परतेने कारवाई केली. ज्यांनी त्रुटी ठेवल्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ज्या डॉक्टरांनी गैरप्रकार केले, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र पोलिसांनी वेगळे नमुने घेऊन ठेवले नसते, तर हे लक्षातही आले नसते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.