विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा संपली! मतमोजणीला झाली सुरूवात

पुणे, 23 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (दि.23) पार पडणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच या मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्यात 288 विधानसभा मतदारसंघात 20 तारखेला मतदान पार पडले. या निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार, एकनाथ शिंदे, हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, रोहित पवार, राम शिंदे, सदा सरवणकर, सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, धनंजय मुंडे यांसारख्या बड्या नेत्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला मतमोजणीनंतर होणार आहे. त्यामुळे या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

यंदा मतदानाच्या आकडेवारीत वाढ

दरम्यान, महाराष्ट्रात यंदा विधानसभा निवडणुकीत 66.05 टक्के इतके मतदान झाले आहे. ही टक्केवारी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 5 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा कोणत्या राजकीय पक्षाला होणार? हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 4 हजार 136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीत प्रामुख्याने महायुती विरूद्ध महाविकास आघाडी यांच्यातच सामना असणार आहे.

महायुती 289 जागा, मविआ 282 जागा

यावेळी महायुतीकडून 289 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात आले आहेत. यामध्ये भाजप सर्वाधिक 149 जागा, शिवसेना 81 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 59 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने 282 उमेदवार दिले आहेत. तर त्यांनी उर्वरित जागा घटक पक्षांना दिल्या आहेत. यामध्ये काँग्रेस सर्वाधिक 101 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 95 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष 86 जागांवर निवडणूक लढवत आहेत.

मनसे आणि वंचित फॅक्टर कडे लक्ष!

त्याचबरोबर राज्यातील विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने देखील 125 उमेदवार उभे केले आहेत. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाने ही 200 जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि मनसे दोन पक्षांच्या उमेदवारांचा निवडणुकीच्या निकालावर किती परिणाम होतोय? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

बंडखोरीचा कोणाला फटका बसणार?

दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागला आहे. यामध्ये पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीचा फटका काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 2 हजार 086 अपक्ष उमेदवार आहेत. त्यातील काहीजण बंडखोर उमेदवार आहेत. अशा परिस्थितीत राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *