मुंबई, 10 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) शिवसेना पक्षाच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आज लागणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज सायंकाळी या संदर्भातील निकालाचे वाचन करणार आहेत. यामध्ये शिवसेना पक्षाच्या शिंदे गटाच्या 16 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर हे आज शिंदे गटाच्या की ठाकरे गटाच्या बाजूने निकाल देणार? याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेत मोठी फूट पडली
तत्पूर्वी, एकनाथ शिंदे यांनी जुन 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारून भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. यावेळी शिंदेंना शिवसेनेच्या 40 आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेना पक्षात मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर शिंदे गटाने देखील ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे. तर राहुल नार्वेकर यांनी हा निकाल 10 जानेवारी पर्यंत द्यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानुसार, विधानसभा अध्यक्ष आज सायंकाळी या प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत.
या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता
शिंदे गटाचे आमदार:- एकनाथ शिंदे, भरत गोगावले, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, तानाजी सावंत, संजय शिरसाठ, यामिनी जाधव, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, चिमणराव पाटील, महेश शिंदे, बालाजी कल्याणकर, संजय रायमूळकर, रमेश बोरनारे, बालाजी किणीकर आणि अनिल बाबर.
ठाकरे गटाचे आमदार:- सुनिल प्रभू, भास्कर जाधव, रवींद्र वायकर, वैभव नाईक, नितीन देशमुख, राजन साळवी, अजय चौधरी, राहुल पाटील, सुनिल राऊत, कैलास पाटील, संजय पोतनीस, रमेश कोरगावंकर, उदयसिंह राजपूत आणि प्रकाश फातर्फेकर.