इयत्ता दुसरीपासूनच्या शाळांची वेळ बदलणार

सकाळी शाळा घेण्याचे आदेश

नागपूर, 19 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील इयत्ता दुसरीपासूनच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. तर हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांसाठी लागू होणार आहे. दीपक केसरकर यांनी ही घोषणा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली आहे. तर यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतरच शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. या समितीमध्ये बालरोग तज्ञ आणि मनोवैज्ञानिक यांचा समावेश असणार आहे.

दरम्यान, राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी काही दिवसांपूर्वी मुलांना चांगली झोप मिळावी, याकरिता शाळांची वेळ बदलण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. राज्य सरकारने शाळांची वेळ बदलण्याचा विचार करावा, असे राज्यपाल म्हणाले होते. यासंदर्भातील सूचना त्यांनी राज्य सरकारला दिल्या होत्या. त्यानुसार राज्यपालांच्या या सूचनेला आता शिक्षण मंत्र्यांनी प्रतिसाद दिला आहे.



यासंदर्भात दीपक केसरकर यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. “शाळेत जाण्यासाठी मुलांना लवकर उठावे लागत असल्याने  त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे या मुलांच्या मेंदूच्या विकासात काही समस्या निर्माण होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याचा अहवाल लवकरच येईल. त्यानुसार , शाळेची वेळ निश्चित केली जाईल. आम्ही नवीन शैक्षणिक धोरणानुसार यासंदर्भातील निर्णय घेऊ,” असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *