मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळण्यास सुरूवात

मुंबई, 29 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात पाठविण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार, आतापर्यंत राज्यातील 1.08 कोटींहून अधिक महिलांना तिसऱ्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यात आला आहे. त्यासाठी राज्य सरकारने 2 हजार 651 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तर उर्वरित महिलांना महिना अखेरपर्यंत लाभ मिळेल. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी (दि.29) दिली आहे.

https://x.com/iAditiTatkare/status/1840305648560656585?t=p27P59jXsSAqr4JhLd7wDg&s=19

https://x.com/iAditiTatkare/status/1840305651840622666?t=Ov0zb9LdYwTrv7zD6BYC6Q&s=19

महिना अखेरपर्यंत पैसे मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना तिसरा हप्ता देण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, उर्वरित सर्व पात्र महिलांना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या महिला भगिनींना यापूर्वी लाभ मिळाला होता, त्यांना तिसरा हफ्ता देण्यात येणार आहे. तसेच ज्यांना यापूर्वी काही तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत, असे देखील आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सर्व पात्र महिलांना या महिनाअखेर पर्यंत या योजनेचे पैसे मिळणार आहेत.

https://x.com/iAditiTatkare/status/1840306333796679992?t=wvzRURNfwxf3-4XUCPVl8w&s=19

https://x.com/iAditiTatkare/status/1840306689037439363?t=l0H_LzNTL0RGPOXAE1Z1HQ&s=19

अर्ज भरण्याची मुदत उद्या संपणार

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला नाही, अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर व्हाव्यात, या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलेच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात थेट दरमहा 1,500 रुपये जमा करण्यात येतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी राज्यातील 2 कोटी महिलांना लाभ देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *