मुंबई, 15 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त सात आमदारांची यादी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवली होती. सात आमदारांच्या या यादीला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या सात नेत्यांची आता विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यपालांनी नियुक्त केलेल्या या आमदारांचा शपथविधी सोहळा आज (दि.15) दुपारी विधानभवनात पार पडला. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या राज्यपाल नियुक्त आमदारांना शपथ दिली.
https://x.com/ANI/status/1846088259459600814?t=z31OQUPLha3JswdQ1VVsdA&s=19
पहा कोणाला संधी?
विधानपरिषदेच्या या राज्यपाल नियुक्त या सात आमदारांमध्ये भाजपचे तीन, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. या यादीत भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि बाबूसिंग महाराज राठोड, शिवसेना पक्षाकडून हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना संधी देण्यात आली आहे. यावेळी विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त हेमंत पाटील, पंकज भुजबळ, मनीषा कायंदे, इद्रिस नायकवडी, विक्रांत पाटील, बाबुसिंग महाराज राठोड, चित्रा वाघ यांना विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.
https://x.com/ANI/status/1846031982117175425?t=6039t__JX9y9rtUwlJFoKA&s=19
12 आमदारांचे प्रकरण कोर्टात प्रलंबित
दरम्यान, 2020 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाठवली होती. बराच काळ उलटून देखील या यादीवर कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यानंतर आलेल्या महायुती सरकारने ठाकरे सरकारची ही 12 आमदारांची यादी रद्द करून नवी यादी राज्यपालांकडे पाठवली होती. त्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण सध्या कोर्टात प्रलंबित आहे. या याचिकेवरील युक्तीवाद पुर्ण झाला आहे. त्याचा निकाल येणे बाकी आहे. त्यानंतर राज्यपालांनी आता 7 आमदारांची विधानपरिषदेवर नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे.