दिल्ली, 08 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या संदर्भातील याचिकेवर शुक्रवारी (दि. 09 ऑगस्ट) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. नीट-पीजी परीक्षा परीक्षा 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे या याचिकेवर लवकरात लवकर निर्णय देण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या परीक्षेला बसलेल्या अनेक उमेदवारांना शहरांमध्ये परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत, जिथे त्यांना पोहोचणे कठीण आहे, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.
https://x.com/barandbench/status/1821416472482058486?s=19
11 ऑगस्ट रोजी परीक्षा
विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या शहरांबाबत 31 जुलै रोजी माहिती देण्यात आली होती. परीक्षा केंद्राची माहिती 8 ऑगस्टला दिली जाईल, तर परीक्षा 11 ऑगस्टला होणार आहे. एवढ्या कमी वेळेत केंद्रापर्यंत पोहोचणे विद्यार्थ्यांना अवघड होणार आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी उमेदवारांना संबंधित केंद्रांवर जाण्यासाठी खूप कमी वेळ मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर, 11 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे.
परीक्षेला स्थगिती मिळणार?
या याचिकेवर निर्णय होईपर्यंत परीक्षेला स्थगिती द्यावी, अशी विनंती ही याचिकाकर्त्याने केली आहे. परीक्षा दोन बॅचमध्ये आयोजित केली जाणार आहे आणि सामान्यीकरणाचे सूत्र उमेदवारांना माहित नसल्याने भीती निर्माण झाली आहे. यासाठी सर्व उमेदवारांसाठी एकसमान आणि निष्पक्ष चाचणी वातावरण सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा एकाच बॅचमध्ये आयोजित करणे आवश्यक आहे, असे देखील याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. याचिकाकर्त्यांचे वकील अनस तन्वीर यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर हे प्रकरण सादर केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची उद्या सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.