नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम कोर्ट आज निकाल जाहीर करणार!

नवी दिल्ली, 04 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्ट निकाल जाहीर करणार आहे. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव या नेत्यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तेंव्हा मुंबई हायकोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवले होते. यासोबतच कोर्टाने राणा यांना 2 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. या निकालाविरोधात नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लक्ष!

तेंव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या याचिकेवरील सुनावणी आता पूर्ण झाली आहे. तर आज नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम कोर्ट आपला निकाल देणार आहे. तर दुसरीकडे नवनीत राणा यांना भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघातून तिकीट दिले आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निकाल कायम ठेवल्यास नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द होऊ शकते. तसे झाल्यास लोकसभा निवडणुकीसाठी नवनीत राणा यांना त्यांचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राविषयी सुप्रीम कोर्ट आज काय निर्णय देणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

https://twitter.com/ANI/status/1775717943264895198?s=19

आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार

नवनीत राणा यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राविषयी सुप्रीम कोर्ट आज निकाल जाहीर करणार आहे. तसेच नवनीत राणा या त्यांचा उमेदवारी अर्ज आजच दाखल करणार आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर नवनीत राणा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी आज अमरावती येथील हनुमानगढी मंदिरात पूजा केली. त्यावेळी त्यांचे पती आमदार रवी राणा हे त्यांच्यासोबत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *