कोलकाता, 19 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी मंगळवारी म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या सुनावणी कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://x.com/ANI/status/1825128586875113601?s=19
याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे
कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमधील सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेविरोधात सध्या देशभरात डॉक्टरांकडून निदर्शने केली जात आहेत. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच डॉक्टरांनी त्यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने 13 ऑगस्ट रोजी हे प्रकरण पोलिसांकडून सीबीआयकडे सोपविले होते. तेंव्हापासून या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे.
काय आहे प्रकरण?
आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्ट रोजी सकाळी एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी मृत डॉक्टरांच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पोस्टमॉर्टम अहवालात या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात निष्पन्न झाले. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी त्यांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्याच्या आधारे आरोपी संजय राय याला याप्रकरणी अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने हे सर्व आरोप मान्य केले. दरम्यान, ही पीडित डॉक्टर रात्री 12 वाजता मित्रांसोबत जेवण आटोपून ती विश्रांतीसाठी सेमिनार हॉलमध्ये गेली होती, त्यावेळी तिच्यासोबत हा प्रकार घडला.