दिल्ली, 13 मे: (विश्वजीत खाटमोडे) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणारी सुप्रीम कोर्टाने आज फेटाळली आहे. केजरीवाल यांना अटक केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करण्याचे कोणताही कायदेशीर अधिकार नाहीत, असे सुप्रीम कोर्टाने यावेळी म्हटले आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. राज्यपालांना हवे असल्यास ते अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई करू शकतात. परंतु, आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असे न्यायमूर्तींनी ही याचिका फेटाळून लावत असताना सांगितले.
https://x.com/ANI/status/1789902931497484771
दारू घोटाळा प्रकरणात अटक झाली होती
तत्पूर्वी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रीग प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर केजरीवाल यांना तिहार तुरूंगात ठेवण्यात आले होते. मात्र तरी देखील त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नव्हता. या पार्श्वभूमीवर, एका याचिकाकर्त्याने अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वैयक्तिक स्वार्थामुळे हे पद सोडत नाहीत, असे या याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने आज त्यांची ही याचिका फेटाळून लावली आहे.
1 जूनपर्यंत जामीन मंजूर
तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने थोडा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्याचवेळी कोर्टाने केजरीवाल यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यानंतर अरविंद केजरीवाल हे सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत.