खडकवासला प्रकल्पातून नवीन मुठा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन 4 मार्चपासून सोडण्यात येणार

पुणे, 24 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कालवा सल्लागार समितीची पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक मंत्री, नेते आणि विविध अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत खडकवासला प्रकल्पातून नवीन मुठा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानूसार, येत्या 4 मार्चपासून खडकवासला प्रकल्पातून नवीन मुठा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे पाणी गळतीच्या उपाययोजना राबवून पाणीबचत करावी, अशा सूचना अजित पवार यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यासोबतच या बैठकीत कुकडी प्रकल्पातून 1 मार्च रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कर्जत तालुक्यातील 54 गावांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.

https://twitter.com/Info_Pune/status/1761315925104427487?s=19

https://twitter.com/supriya_sule/status/1761234001736474938?s=19

अनेक गावांना पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे: सुप्रिया सुळे

या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघाच्या दुष्काळी भागांत पाण्याचे योग्य ते नियोजन करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यात यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे. पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा यांची नितांत गरज आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने शहरी भागांनाही पिण्याच्या पाण्याची टंचाईची झळ बसू लागली आहे. याखेरीज शेतीसाठीही अपुरे पाणी आहे. जनाई शिरसाई पाणी योजनेच्या पाण्याचे देखील योग्य नियोजन आवशयक असून त्या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळणे आवश्यक आहे. शासनाने दुष्काळ निवारण्याच्या कामाला प्राधान्य देऊन पुण्याचे योग्य नियोजन करावे व जनतेला आधार द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

शासनाने पाण्याचे नियोजन करावे: सुप्रिया सुळे

अद्याप तीव्र उन्हाळा सुरु व्हायचा आहे, तोवरच अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. यामध्ये दुर्गम भागातील गावांचा समावेश आहे. या गावांचा प्राधान्याने विचार करुन त्यांना पाणी पोहोचविण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्या. बहुतांश गावांमध्ये पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. पशुधन जगविण्यासाठी चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स यांची प्रकर्षाने गरज आहे. शासनाने तातडीने याबाबत योग्य ते नियोजन आणि उपाय करावे. शासनाने या स्थितीचा आढावा घेऊन याबाबतही योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना प्रशासनाला द्याव्या, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी या बैठकीत केली आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1761237714928619975?s=19

रोहित पवारांनी मानले अजित पवारांचे आभार!

तसेच या बैठकीत कुकडी प्रकल्पातून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. कुकडी प्रकल्पातून 1 मार्च रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळं कर्जत तालुक्यातील 54 गावांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाबाबत अजित पवार यांचे माझ्या मतदारसंघाच्या वतीने आभार! असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *