दिल्ली, 03 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) केंद्र सरकारने हिट अँड रन हा नवा कायदा आणला होता. या कायद्याविरोधात ट्रक आणि खाजगी बस चालकांनी देशव्यापी संप पुकारला होता. मात्र सरकारच्या आश्वासनानंतर ट्रकचालकांनी हा संप मागे घेतला आहे. या नवीन कायद्याबाबत काल रात्री ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट आणि गृह मंत्रालय यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. शेवटी सरकारने त्यांना आश्वासन दिले की कायद्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे या आश्वासनानंतर ट्रकचालकांचा हा संप मिटला आहे. त्यामुळे ट्रक आणि खाजगी बसची वाहतूक आजपासून सुरळीत चालू झाली आहे.
https://twitter.com/ANI/status/1742220772884767161?s=19
दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून ट्रक आणि खाजगी बस चालकांनी संप पुकारला होता. या संपामुळे काही पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर, देशभरातील बहुतांश पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच या संपामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली होती. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर वाढले होते. याशिवाय, एलपीजी गॅसचा देखील तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला होता. सोबतच खाजगी बस चालकांनी संप पुकारल्यामुळे काही ठिकाणी स्कूल बस देखील बंद होत्या. याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला होता. मात्र, ट्रक आणि खाजगी बस चालकांनी हा संप मागे घेतल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
तत्पूर्वी, केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेत हिट अँड रनचा कायदा मंजूर केला होता. मात्र, या कायद्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. या नवीन कायद्यानुसार, गाडीच्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी चालक पोलिसांना न सांगता घटनास्थळावरून पळून गेला, तर त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. सोबतच त्याला 7 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद देखील करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यातील आरोपीला जामीन देखील मिळणार नाही. यापूर्वीच्या कायद्यात या प्रकरणातील गुन्हेगाराला लगेचच जामीन मिळत होता. तसेच यापूर्वीच्या कायद्यात गाडीच्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यास जास्तीत जास्त 2 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली होती.