मुंबई, 17 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1802552554146177254?s=19
पुरंदर, इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती
मी या महिन्यातील 12 आणि 13 जून रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. अल्प पर्जन्यमान असलेल्या ह्या भागातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य शासनाने प्रामुख्याने पुरंदर उपसा सिंचन योजना, गुंजवणी प्रकल्प, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना हाती घेतल्या आहेत. मात्र या दौऱ्यावेळी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला असता, सदर योजनांच्या अंमलबजावणी बाबत अनेक समस्या असल्याचे दिसून आले. या जनसंवादावेळी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा याकरिता ग्रामस्थांनी मागण्यांसोबत काही उपाययोजना देखील सुचवल्या. सदर समस्या आणि मागण्यांबाबत प्रकल्प निहाय व गावनिहाय स्वतंत्र टिप्पणी सोबत जोडली आहे. कृपया टिप्पणीचे अवलोकन व्हावे, असे शरद पवार यांनी यामध्ये म्हटले आहे.
मुंबई येथे बैठकीचे आयोजन करावे
पुणे जिल्ह्यातील उपरोक्त तालुक्यांतील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपणास विनंती आहे की, आपल्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे दोनही सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच मृद व जलसंधारण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकीचे आयोजन व्हावे. उक्त बैठकीस संबंधित विभागाचे सचिव व अधिकारी यांना हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात व स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे. सदर बैठकीवेळी दौऱ्याप्रसंगी निदर्शनास आलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासंदर्भात चर्चा घडून यावी. तसेच कायस्वरूपी उपाययोजने संदर्भात चर्चा आणि नियोजन व्हावे. अशी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो, अशी विनंती शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या पत्राच्या माध्यमातून केली आहे.