नवी दिल्ली, 06 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाचाच असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर शरद पवार गटाला आता पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला 7 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे शरद पवार गट निवडणूक आयोगासमोर कोणती नावे सादर करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://x.com/ANI/status/1754868297076449649?s=20
शरद पवार गटाला पक्षाचे कोणते नाव आणि चिन्ह मिळणार?
शरद पवार गटाने पक्ष आणि चिन्हाच्या नावाची यादी निवडणूक आयोगासमोर सादर केल्यानंतर निवडणूक आयोग त्यातीलच एक नाव त्यांना देईल. निवडणूक आयोगाने दिलेले पक्षाचे नाव आणि चिन्ह शरद पवार गटाला आगामी निवडणुकांमध्ये वापरता येणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गट कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार? याकडे सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यासोबतच निवडणूक आयोगाच्या आजच्या निकालाविरोधात शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शरद पवार गट यासंदर्भात सुप्रीम कोर्टात धाव घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला होता
तत्पूर्वी, शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादात निवडणूक आयोगाने शिंदे गट ही खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला होता. त्यावेळी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले होते. त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक आयोगासमोर पक्षाची काही नवीन नावे आणि चिन्ह सादर करण्यात आली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पक्षाचे नाव दिले होते. तसेच यावेळी त्यांना निवडणूक आयोगाने मशाल हे पक्षचिन्ह दिले होते.