दिल्ली, 09 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि बांगलादेश यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (दि.09) खेळविण्यात येणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाईल. तत्पूर्वी, ग्वाल्हेर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 128 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघाने हे लक्ष्य 11.5 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले.
https://x.com/BCCI/status/1843495020420313485?t=QRhTMg-BHWUBlAttu9jLng&s=19
पहिल्या सामन्यात दमदार विजय
भारताच्या या विजयाचा शिल्पकार अर्शदीप सिंग ठरला होता. त्याने या सामन्यात 3.5 षटकांत 14 धावा देऊन बांगलादेशचे 3 गडी बाद केले होते. सोबतच पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याने देखील अष्टपैलू कामगिरी करीत बांगलादेशचा एक गडी बाद केला होता, तसेच त्याने या सामन्यात 16 चेंडूत नाबाद 39 धावांची खेळी केली होती. तत्पूर्वी, पहिल्या सामन्यात मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांना भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली होती. मयंक यादवने या सामन्यात चमकदार कामगिरी करीत 4 षटकांत 21 धावा देऊन 1 विकेट घेतली होती. यामध्ये मयंकने 1 षटक निर्धाव टाकले होते.
भारताचा संघ वरचढ
दरम्यान, या मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपविण्यात आले आहे. या मालिकेत भारताकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जोडी सलामीला फलंदाजी करण्यासाठी येत आहे. सोबतच सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, रियान पराग, रिंकू सिंग यांसारख्या फलंदाजांवर मधल्या फळीची जबाबदारी असणार आहे. तर गोलंदाजीत भारताकडे अर्शदीप सिंग, हर्षित राणा , मयंक यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्ती यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. या खेळाडूंवरून भारतीय संघ बांग्लादेशच्या तुलनेत बलाढ्य असल्याचे दिसत आहे. तसेच ही टी-20 मालिका भारतातच खेळवली जात आहे. त्यामुळे बांगलादेशला या मालिकेतील सामने जिंकणे कठीण असल्याचे मानले जात आहे.
खेळपट्टी फलंदाजीला पोषक?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज सायंकाळी 7 वाजता होणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. या सामन्याची खेळपट्टी फलंदाजीला पोषक ठरण्याची शक्यता आहे. कारण यंदाच्या आयपीएलमध्ये या मैदानावर धावांचा पाऊस पडला होता. तसेच या मैदानावर फिरकी गोलंदाजांना देखील थोडी मदत मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या सामन्याची खेळपट्टी कशी असणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील सामने स्पोर्ट्स18 या चॅनलवर पाहता येतील. तसेच जिओ सिनेमा या ॲपवर देखील तुम्ही भारत आणि बांगलादेश या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
भारतीय संघ:-
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव आणि तिलक वर्मा.
बांगलादेशचा संघ:-
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झीद हसन तमीम, परवेझ हुसैन इमॉन, तौहीद हृदोय, महमूद उल्ला, लिटन कुमेर दास, जेकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब आणि रकीबुल हसन.