बारामती, 06 मार्च: पुणे जिल्ह्यात आंतरजातीय विवाह केल्यामुळे एका बौद्ध तरूणाला मारहाण करण्याचा प्रकार घडला असून, अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या हस्तक्षेपानंतर संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी बारामती दौऱ्यात या प्रकरणाची दखल घेतली. तसेच त्यांनी पोलिसांना याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दि. 1 मार्च 2025 रोजी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बौद्ध तरूणाला मारहाण
तत्पूर्वी, बारामती तालुक्यातील माळेगाव येथील लक्ष्मण राजेंद्र भोसले या उच्चशिक्षित बौद्ध तरूणाने आंतरजातीय विवाह केला. या कारणावरून माळशिरस तालुक्यातील नातेपुते परिसरातील काही गावगुंडांनी त्याचे आणि त्याच्या पत्नीचे बळजबरीने अपहरण केले. तसेच त्यांनी या तरूणाला मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. सोबतच ते लक्ष्मण भोसले यांच्या पत्नीला जबरदस्तीने त्यांच्यापासून वेगळे करून घेऊन गेले.
अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या आदेशावरून गुन्हा दाखल
या मारहाणीच्या व जातीदोषातून दिलेल्या वागणुकीच्या घटनेबाबत ॲड. अक्षय गायकवाड यांच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे धाव घेतली. सोबतच त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, तसेच बारामती व सासवड विभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे वारंवार दाद मागूनही योग्य कारवाई झाली नाही. दरम्यान, भोर येथील विक्रम गायकवाड बौद्ध तरूणाची आंतरजातीय विवाह केल्यामुळे हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असताना लक्ष्मण भोसले या तरूणाचे अपहरण करून मारहाण झाल्याचे प्रकरण घडले. या पार्श्वभूमीवर, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी 28 फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी बारामती येथे याप्रकरणाची गंभीर दखल घेत याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षकांना दिले.
या कलमांखाली गुन्हा नोंदवला
त्यानुसार, याप्रकरणात शाखा करचे, निखिल खरात, पृथ्वीराज करचे, गौरव होळकर यांच्यासह इतर आरोपींवरही भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 140(2), 115(2), 118(1), 189(2), 190, 191(2), 191(3) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 अंतर्गत 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va), 3(2)(5) या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर सासवड येथील उपविभागीय अधिकारी तपास करत असून, सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
लक्ष्मण भोसले आणि त्यांची पत्नी हे 2021 पासून कॉलेजमध्ये शिकत होते. यादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी 28 डिसेंबर 2024 रोजी आळंदीत जाऊन विवाह केला. मात्र, विवाहानंतर घरी परतत असताना या आरोपींनी त्यांचे अपहरण करून बेदम मारहाण केली. एवढेच नाही, तर लक्ष्मण भोसले यांच्या डोक्याला बंदूक लावून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
दाम्पत्याला पोलीस संरक्षण
याप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तात्काळ तपास केला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याला पोलीस संरक्षण देण्याचा आदेशही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी जारी केला आहे.