माळेगाव बुद्रुक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतराचा कार्यक्रम संपन्न

माळेगाव बु, 09 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे मंगळवारी (दि.08) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामकरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव असे नाव देण्यात आले आहे. या संदर्भातील शासन निर्णय 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यावेळी याठिकाणी अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माळेगाव बुद्रुक या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी, विविध अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1843642743572066664?t=Ba5lDFFfhdlFRD7x14p9cg&s=19

अजित पवारांनी काय म्हटले?

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. औंधमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 2 हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. तसेच सावित्रीबाई फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 500 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. सोबतच अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा पद्धतीने राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील शिक्षण संस्थांना समाजसुधारकांची नावे दिली आहेत, असे अजित पवारांनी यावेळी म्हटले आहे.

तसेच आपल्या राज्यात 434 आयटीआय संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची शिकवण मिळत आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे युवा पिढीपर्यंत पोहोचायचे आहेत. राज्यातील एक हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. स्किल इंडिया डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत आता व्हर्चुअल क्लासरूम सुरू करण्यात आले आहेत. आयटीआयमध्ये आता स्पर्धात्मक अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत, असे देखील अजित पवारांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *