नवी मुंबई, 26 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे निघाला आहे. त्यांचा मोर्चा आज नवी मुंबईतील वाशी येथे आला आहे. यावेळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांनी यावेळी जरांगे पाटील यांना सरकारचा जीआर दिला. हा जीआर मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मराठा बांधवांना वाचून दाखवला आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी शिंदे समिती रद्द होणार नसल्याची माहिती दिली. तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. त्यांच्या गणगोतांना देखील त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजे. या संदर्भातील अध्यादेश सरकारने द्यावा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
शिंदे समिती रद्द न करण्याचा निर्णय सरकारने मान्य केला: जरांगे पाटील
शिंदे समिती रद्द करायची नाही. या समितीने नोंदी शोधण्याचे काम करत रहावे, या समितीची सरकारने दोन महिने मुदत वाढवली आहे. तसेच यापुढे ती टप्प्याटप्प्याने वाढवणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी यावेळी दिली. ज्यांची नोंद मिळाली त्याच्या गणगोतांना देखील त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजे, त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजेत. अशी मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी केली आहे.
ज्यांची नोंद सापडलीय त्यांनी हा माझा सोयरा आहे म्हणून शपथपत्र द्यावे: जरांगे
तसेच 54 लाख नोंदी आणि त्यांचे सगेसोयरे यांना आरक्षण द्यायचं असेल, तर ज्यांच्याकडे नोंद नाही, त्यांनी शपथपत्र द्यायचं की हा माझा सोयरा आहे, त्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्या. त्या शपथपत्राच्या आधारावर लगेच दिलं तर, तुम्ही त्याची नंतर गृह चौकशी करा, तो खोटा पाहुणा असला तर देऊ नका. असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. मात्र पण शपथपत्र घेताना शंभर रुपये घेतले, तर आमचे पैसे किती जाणार? त्यामुळे ते देखील मोफत करा अशी मागणी केली होती. ती मागणी सरकारने मान्य केली असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी यावेळी दिली.