मुंबई, 22 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरूवारी (दि.22) राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाच्या आजच्या बैठकीमध्ये दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती लोकसेवा आयोगाने दिली आहे.
https://x.com/mpsc_office/status/1826513913434808777?s=19
विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते
आयबीपीएस परीक्षा आणि लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 25 ऑगस्ट रोजी होणार होत्या. त्यामुळे एमपीएससी कडून घेण्यात येणारी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. तसेच राज्य सेवा पूर्व परीक्षेत कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. त्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते.
https://x.com/PawarSpeaks/status/1826324638814630279?s=19
शरद पवारांनी इशारा दिला होता
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांसारख्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. या आंदोलनात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे नेते देखील सहभागी झाले होते. तसेच शरद पवार यांनीही विद्यार्थांच्या या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा दिला होता. राज्य सरकारने या परीक्षेसंदर्भात आजपर्यंत योग्य तो निर्णय घेतला नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे शरद पवारांनी म्हटले होते.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1826516039162622126?s=19
देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल लोकसेवा आयोगाचे आभार मानले आहेत. काल एमपीएससी अध्यक्षांना मी विनंती केली होती. या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या या मागणीवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती केली होती. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली होती.