सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्युचे खरे कारण झाले उघड

परभणी, 16 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) परभणी येथे झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी 50 आंदोलकांना अटक केली होती. यामधील सोमनाथ सुर्यवंशी या आंदोलकांचा रविवारी (दि.15) न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पार्थिवाचे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात ऑन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आता समोर आला आहे. या अहवालात सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूचे कारण त्यांच्या शरीरावरील अनेक जखमा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

https://x.com/VBAforIndia/status/1868581928104047042?t=xFmMJtJNSBUtVeGn8vhncw&s=19

https://x.com/VBAforIndia/status/1868565650399986100?t=XPq540PLQSBRvycZtJR-Qg&s=19

प्रकाश आंबेडकर परभणीत दाखल

त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सध्या आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट ट्विट केला आहे. “सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या मृत्यूचे कारण, शरीरावर अनेक जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सोमनाथ सुर्यवंशी – एक भीमसैनिक आणि वडार समाजातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता होते. ते परभणीतील एका महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत होते. आम्ही त्यांच्यासाठी न्यायाची लढाई लढणार!” असे प्रकाश आंबेडकर यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर हे दुपारीच परभणीत दाखल झाले आहेत. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी परभणी येथील घटनेची आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली. तसेच या घटनेसंदर्भात त्यांनी परभणी गेस्ट हाऊस येथे सर्व कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. याप्रसंगी उपस्थित लोकांनी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान केलेल्या मारहाणीची माहिती प्रकाश आंबेडकर यांना दिली.

राज्यभरात बंदचे आवाहन

सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील निधनानंतर सध्या आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात आज बंद पुकारण्यात आला आहे. तसेच अनेक शहरांत सध्या विविध आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी. तसेच त्यांच्या मृत्यूला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंबेडकरी संघटनांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *