राजस्थान, 17 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) संसद भवन घुसखोरी प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. याप्रकरणात सातत्याने नवी माहिती समोर येत आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपींच्या फोनचे भाग राजस्थानमधून जप्त करण्यात आले आहेत. सर्व फोन जळालेल्या अवस्थेत सापडले आहेत. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आता या फोनवरून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अटक केलेल्या ललित झा याच्याकडे सर्व आरोपींचे फोन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
https://x.com/ANI/status/1736225433967014225?s=20
दरम्यान, 13 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात संसदेचे कामकाज सुरू असताना 2 अज्ञात व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या घेतल्या. त्यानंतर त्यांनी सभागृहात कलर स्मोक फेकला, यातून पिवळा धूर बाहेर पडत होता. या घटनेमुळे संसदेत एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर काही खासदार, सुरक्षा रक्षक यांनी मिळून या दोघांना पकडले आणि त्यांना बाहेर काढले. तसेच त्यांनी या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचवेळी संसदेच्या बाहेर देखील आणखी 2 जणांनी कलर स्मोक घेऊन आंदोलन केले. त्यांना देखील पोलिसांनी अटक केली होती.
अटक केलेल्या या चौघांचे मोबाईल घेऊन ललित झा हा पळून गेला होता. ललित झा हा संसद भवन घुसखोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून तो या चौघांचे फोन घेऊन राजस्थानला गेला होता. तेथे त्याने हे फोन नष्ट केले असण्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी वर्तवली आहे. त्या दृष्टीने सध्या त्याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. दरम्यान, संसद घुसखोरी प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सागर शर्मा, मनोरंजन डी, नीलम आझाद, अमोल शिंदे, ललित झा आणि महेश कुमावत असे अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.