मुंबई, 07 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कर्नाटकातून एकाला अटक केली आहे. बिकाराम जलाराम बिश्नोई असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा मॅसेज पाठवला होता. “सलमान खानला जिवंत रहायचे असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा 5 कोटी रुपये द्यावेत,” अशी धमकी या आरोपीने मॅसेजमध्ये दिली होती.
https://x.com/ANI/status/1854383411722690799?t=b-LUd0I7x_vVqLrK8zqbrg&s=19
वाहतूक पोलिसांना धमकीचा मॅसेज
या आरोपीने मंगळवारी (दि.05) हा धमकीचा मॅसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पाठवला होता. त्यानंतर याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी या आरोपीचा शोध घेणे सुरू केले. त्यानंतर याप्रकरणात बिकाराम जलाराम बिश्नोई नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, आरोपीने स्वत:ला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा केला आहे. परंतु, पोलिसांच्या तपासात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपी भिखाराम विश्नोई हा मूळचा राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील आहे. तो सध्या कर्नाटकात राहत होता.
धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ
दरम्यान, मागील काही काळापासून सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांमध्ये आणखी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, सलमान खानच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. यापूर्वीही 2 कोटी रुपयांची मागणी करत सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी 20 वर्षीय एका आरोपीला नोएडा मधून अटक केली होती.