मुंबई, 16 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) ज्येष्ठ उद्योगपती टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रतन टाटा यांना धमकी देणाऱ्या त्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेतला आहे. या व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोन करून रतन टाटा यांच्या सुरक्षेत वाढ करा, अन्यथा त्यांची अवस्था देखील सायरस मिस्त्रीसारखी होईल, असे म्हटले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी रतन टाटा यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
फोन करणारा व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचे समजते. त्याला स्किझोफ्रेनिया नावाचा आजार आहे. त्याने रतन टाटा यांना धमकी दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी एक पथक तैनात केले. त्यावेळी पोलिसांनी या आरोपीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा मोबाईल बंद होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक सहाय्य आणि टेलिकॉम कंपनीच्या मदतीने या आरोपीचे लोकेशन ट्रेस केले. कॉलचे लोकेशन ट्रेस केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून ताब्यात घेतले.
https://x.com/ANI/status/1735922376016277738?s=20
दरम्यान, फोन करणारा हा व्यक्ती पुण्याचा रहिवासी असल्याचे उघडकीस आले आहे. तो गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता झाला होता. यासंदर्भात त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तसेच या व्यक्तीला स्किझोफ्रेनिया नावाचा आजार आहे. तो कोणालाही न सांगता घरातून मोबाईल घेऊन निघून गेला होता. त्यानंतर त्याने मुंबई पोलिसांना फोन करत रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तर हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याने त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.