मुंबई, 25 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील पोर्श कार अपघात प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या पालकांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पार पडली. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून, दोषींना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मृत मुलांच्या पालकांना दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी या मुलांच्या पालकांचे सांत्वन केले. तरूण मुले अचानक गेल्याने झालेल्या दुःखाची आपल्याला पूर्ण कल्पना आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
https://x.com/mieknathshinde/status/1805281073003422165?s=19
दोषींना कठोर शिक्षा केली जाईल: शिंदे
दरम्यान, पुण्यातील कल्याणी नगर परिसरात 19 जून रोजी रात्री उशीरा हा अपघात झाला होता. या अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या तरूण-तरूणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला तरूण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरूणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या घटनेतील अल्पवयीन आरोपीची सुटका झाल्यानंतर ही केस नव्याने हाती घेत दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मृतांच्या कुटूंबियांना 10 लाखांची मदत
तसेच या अपघात प्रकरणातील दोन्ही मृत मुलांच्या कुटूंबियांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. सोबतच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.