पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता ‘या’ दिवशी मिळणार, कृषिमंत्र्यांची माहिती

दिल्ली, 15 जून: (विश्वजीत खाटमोडे) किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता 18 जून 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरीत करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यातील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता वितरीत करतील. या हप्त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 20 हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिली आहे.

https://twitter.com/ChouhanShivraj/status/1801876133136204062?s=19

पंतप्रधान मोदींच्या हस्ते हप्त्याचे वाटप

हा कार्यक्रम केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय उत्तर प्रदेश सरकारच्या समन्वयाने आयोजित करेल. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे राज्यपाल, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश सरकारचे अनेक मंत्री यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांना वितरीत करतील. तसेच यावेळी 30,000 हून अधिक बचत गटांना कृषी सखी म्हणून प्रमाणपत्रांचे वाटप करतील.

11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा

किसान सन्मान निधी ही केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे. ही योजना सर्वप्रथम 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारने किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 3.04 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली आहे. आता ही रक्कम जारी केल्याने, योजनेच्या सुरूवातीपासून लाभार्थी शेतकऱ्यांना वितरीत केलेली एकूण रक्कम 3.24 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल, असे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये

दरम्यान, केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर वर्षाला 6 हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकरकमी नाही, तर 2-2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये पाठविण्यात येते. तर यापूर्वी लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या आधी 28 फेब्रुवारी रोजी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेअंतर्गत 16 व्या हप्त्याचे पैसे पाठवण्यात आले होते. तर आता या योजनेच्या 17 व्या हप्त्याचे पैसे मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *